MMKuwait

Administrator Doe

General

Jan 23, 2025

महाराष्ट्र दिन

बहु असोत सुंदर संपन्न की महा, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा…
१५० वर्षांपासून ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली असलेला आपला भारत देश १९४७ मध्ये स्वतंत्र झाला. त्यानंतर भारतातील ब्रिटिशांची सत्ता संपुष्टात आली. देशाला स्वातंत्र्य मिळाले; पण राज्यांची निर्मिती होणे अद्याप बाकी होते. मग भाषा आणि प्रदेशानुसार राज्यांची निर्मितीला सुरुवात झाली.
मद्रास राज्यातील तेलुगू भाषिक भागांमध्ये एक शक्तिशाली आंदोलन झाले. त्यानंतर १९५३ मध्ये आंध्र राज्याच्या निर्मितीचा संपूर्ण देशभरात परिणाम झाला आणि राज्य पुनर्रचना आयोगाची नियुक्ती करण्यात आली. १९५६ मध्ये संसदेने राज्य पुनर्रचना कायदा संमत केला; ज्यामुळे भारतीय राज्यांच्या सीमा पुन्हा रेखाटण्यात आल्या.

वास्तविक ‘राज्य पुनर्रचना कायदा’ १९५६ अंतर्गत अनेक राज्ये निर्माण झाली. या कायद्याच्या आधारे कन्नड भाषा बोलणाऱ्या लोकांना म्हैसूर राज्य म्हणजेच कर्नाटक राज्य देण्यात आले. तेलुगू भाषेतील लोकांना आंध्र प्रदेश राज्य मिळाले. त्याच वेळी मल्याळम भाषेच्या लोकांना केरळ आणि तमीळ भाषेच्या लोकांना तमिळनाडू राज्य मिळाले. मराठी आणि गुजराती लोकांना स्वतःचे वेगळे राज्य मिळाले नाही. राज्य पुनर्रचना कायद्यान्वये मुंबई प्रांतासाठी नवीन सीमा तयार केल्या गेल्या होत्या. मुंबईच्या प्रांताच्या सीमा मराठवाडा, विदर्भ, सौराष्ट गुजारतपर्यंत विस्तारून नवीन राज्याची निर्मिती करण्यात आली. ज्यामुळे द्विभाषिक लोकांचा मुंबई प्रांतात समावेश झाला. त्यात मराठीसह कच्छी व कोकणी भाषा बोलणाऱ्या लोकांचा समावेश होता. १९५६ पासून संयुक्त महाराष्ट्र चळवळीद्वारे मराठी भाषकांनी स्वतंत्र राज्याच्या मागणी केली. दुसरीकडे गुजराती भाषेतील लोकांनाही स्वत:चे वेगळे राज्य हवे होते. त्यांनीही चळवळ सुरू केली. या आंदोलन व चळवळींचा परिणाम होऊन, १९६० मध्ये मुंबई पुनर्रचना कायद्यांतर्गत महाराष्ट्र आणि गुजरात अशा दोन राज्यांची निर्मिती झाली.

महाराष्ट्र आणि गुजरात अशा दोन वेगवेगळ्या राज्यांच्या निर्मितीनंतरही हा वाद मिटला नाही. तर, महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांमध्ये मुंबई मिळविण्यासाठी वाद सुरू झाला. एकीकडे महाराष्ट्रीय लोकांना मुंबई हा त्यांच्या राज्याचा भाग म्हणून हवा होता. कारण- तेथील बहुतांश लोक मराठी बोलत होते. तर, मुंबईच्या प्रगतीमध्ये गुजराती लोकांचा जास्त वाटा आहे, असे गुजरात राज्यातील लोकांचे मत होते. त्यामुळे त्यांना मुंबईचा समावेश आपल्या राज्यात असावा, असे वाटत होते. मुंबईला केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर करावे, असे काहींचे मत होते. परंतु, संयुक्त महाराष्ट्र चळवळीने यास प्रखर विरोध केला आणि मुंबईला महाराष्ट्र राज्याची राजधानी करण्याची मागणी केली. संयुक्त महाराष्ट्र समितीमार्फत १९५६ साली मुंबईमध्ये एक मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चावर पोलिसांनी गोळीबार केल्यामुळे तब्बल १०६ कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला चालना मिळाली. मुंबई शहराच्या मध्यभागी असलेला हुतात्मा चौक या लढ्याचे प्रतीक आहे. या मोर्चानंतर १९५६ ते १९६० या काळात संयुक्त महाराष्ट्राची चळवळ अधिक तीव्र झाली. तत्कालीन नेत्यांनी मुंबईसह महाराष्ट्राची निर्मिती व्हावी ही मागणी लावून धरली. अखेर मुंबईचा समावेश महाराष्ट्र राज्यात करण्यात आला. मुंबई शहरात राहणारा प्रत्येक नागरिक स्वत:ला मुंबईकर म्हणवून घेतो. मुंबईत वेगवेगळ्या जाती-धर्मांचे, पंथांचे लोक राहतात; पण जेव्हा ते स्वत:ला मुंबईकर म्हणतात तेव्हा हे सर्व भेद नाहीसे होतात.

Subscribe Our Newsletter